मलकापूर बुलढाणा रोडवर चार चाकी वाहन जाळून खाक; कुटुंब थोडक्यात बचावले.
मलकापूर :शहरातून जाणाऱ्या बुलढाणा रोडवरील मुंधडा पेट्रोल पंप समोर इंडिका चार चाकी वाहनाला भीषण आग लागून वाहन जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने चालक त्याची पत्नी व दोन मुले सुखरूप बचावले आहेत.ही घटना आज दि. 19 मार्च रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. 12 जी.के 1646 मलकापूर कडून मोताळाच्या दिशेने जात होते. या चारचाकी वाहनामध्ये चालक मंगेश तायडे (40) रा. शेलगांव बाजार यांची पत्नी व दोन मुले होती. ते आपल्या वाहनाने मलकापूर कडून शेलगांव बाजार गावी जाण्यासाठी चार निघाले मात्र त्यांच्या नजर चूकीने हॅन्ड ब्रेक काढायचे राहून गेल्याने गाडीचे टायर गरम होऊन त्यांनी पेट घेतला.
गाडीने पेट घेतला असे लक्षात येताच मंगेश व त्याच्या पत्नीने आपल्या दोन्ही लहान मुलांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. गाडीने काही क्षणातच पेट घेतला आगीचा तांडव सुरू झाला, घटनास्थळावरून हाकेच्या अंतरावर पेट्रोलपंप असल्याने रस्त्यावरील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. काही क्षणात आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ टळला. या घटनेची वार्ता शहरात पसरतात नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. रोडवर झालेला वाहतुकीचा खोळंबा वाहतूक पोलिसांनी सुरळीत करून मार्ग मोकळा केला.