महाराष्ट्र
लोणार तालुक्यातील शारा गावात पुन्हा जातीय तणाव! धार्मिक स्थळाजवळ झेंडा फडकवला..
वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात दाखल...
बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी लोणार तालुक्यातील शारा गावात जातीय तणाव निर्माण झाला होता.भीमजयंती निमित्त लावण्यात आलेले झेंडे काढून फेकल्याचा आरोप करीत एका गटाने तब्बल ३ ते ४ तास रास्ता रोको केला होता.
अखेर पोलिसांनी याप्रकरणी शारा ग्रामपंचायतच्या सरपंच, सचिवांसह ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर वातावरण निवळले होते. मात्र आज १८ एप्रिलला पुन्हा गावात तणाव निर्माण झाला आहे. रात्री कुणीतरी गावातील धार्मिक स्थळाजवळ झेंडा आणून लावल्याने तणाव निर्माण झाला आहे, यशिवाय काही जणांनी जातीय तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवल्याचे एका समुदायाचे म्हणणे आहे.
सध्या गावात प्रचंड मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला असून उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी शारा गावात पोहचले असून गावकऱ्यांशी चर्चा सुरू आहे.