लोकसभा निवडणुकीचे बिगुल हे येत्या काही महिन्यांमध्ये कधीही वाजू शकते. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करण्याचे कामही राजकीय पक्षांकडून सुरू झाले आहे.शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काही उमेदवार भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे. अशातच राजकारणात एका रात्रीत बदल घडत असतात, असे सूचक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील खासदार कृपाल तुमाने यांनी केले आहे. राज्यातील दोन पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधातही आहे आणि सत्तेतही आहे. त्यामुळे मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन गट आहेत. या दोन्ही गटाचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार? हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही, तर स्थानिक परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेचे काही उमेदवार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील का? असा प्रश्न कृपाल तुमाने यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकते. राजकारणात एका रात्रीत बदल घडत असतात, असे सूचक वक्तव्य कृपाल तुमाने यांनी केले.जागावाटपाबाबत बोलताना कृपाल तुमाने म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना युती भक्कम आहे आणि दोन्ही पक्ष नेहमीच एकमेकांच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी काम करत असतात. त्यामुळे आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढू या संदर्भात सध्या होकार किंवा नकार देण्याचा प्रश्नच नाही. परंतु आम्ही ज्या चिन्हावर निवडणूक लढलो होतो, त्याच चिन्हावर पुढेही निवडणूक लढवण्याबद्दल आम्हाला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबतच्या सर्व तेरा खासदारांना निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मागच्या वेळेला ज्या 18 जागा आम्ही जिंकलो होतो, त्या सर्व 18 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.
Related Articles
Check Also
Close
- नांदेडमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचे बोट..October 2, 2024