१५ मोबाईलसह चोरटा ताब्यात; धुळे पोलिसांची कारवाई
धुळे : धुळे शहरात सध्या मोबाईल चोरीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे. याच दरम्यान चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका सराईत मोबाईल चोरट्याला पोलिसांनी १५ मोबाईलसह ताब्यात घेतले आहे.
धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अंबिकानगर येथून गेल्या काही दिवसांपूर्वी घरातून महागड्या कंपनीचा मोबाईल चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे प्रकार घडत असल्याने त्यांना आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले होते.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता चाळीसगाव रोड परिसरातील गजानन कॉलनी येथून एका मोबाईल चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जवळपास चोरी केलेले १५ नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. मोबाईल चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पुढील तपास चाळीसगाव रोड पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.