बोंड अळीचे नियोजन..
नांदुरा तालुक्यात कपाशीचे उत्पादन मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते.
खैरा (ता. नांदुरा, जि. बुलडाणा) येथील रवींद्र मापारी हे कपाशी पिकाचे चांगले व्यवस्थापन करणारे शेतकरी म्हणून ओळखले जातात. या वर्षी त्यांनी एक हेक्टर क्षेत्रामध्ये पाच जूनला कपाशीची लागवड केली आहे. या पिकातून आतापर्यंत दोन वेचण्याही झाल्या आहेत. सततच्या पावसाने यंदा कपाशीच्या व्यवस्थापनात मोठे अडथळे आले. पिकाची सातत्याने निगा ठेवत व्यवस्थापन करावे लागले. फवारणी, खत व्यवस्थापनात कटाक्ष पाळावा लागला. गेल्या आठवड्यात कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. यासाठी तातडीने रासायनिक कीडनाशकाची फवारणी घेतली. त्यामुळे नियंत्रण मिळविण्यात यश आले.
गुलाबी बोंड अळीने कोट्यवधींची हानी
या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त होता. सततच्या पावसाचे पाणी पिकात साचून राहू नये यासाठी एक हजार फूट पाइपलाइन करून त्याद्वारे दोन वेळा पिकातील पाणी थेट नदीपात्रात सोडले. यामुळे पिकाचे नुकसान टाळण्यास मदत झाली.
खत नियोजन
कपाशीची लागवड केल्यानंतर १० ते १२ दिवसांनी रासायनिक खतांची पहिली मात्रा दिली. त्यात १०ः२६ः२६ व सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्यात आली. त्यानंतर पंधरा दिवसांनी रासायनिक खताची दुसरी मात्रा दिली. त्यात डीएपी सोबत पोटॅश अशा दोन खतमात्रा देण्यात आल्या.
पीक ४५ ते ५० दिवसांचे असताना ०ः५२ः३४ आणि पीक ६५ ते ७० दिवसांचे असताना ०ः०ः ५० या खतांचा ड्रीपद्वारे वापर केला.बोंड अळी रोखण्यात यशकपाशीचे पीक ३५ ते ४० दिवसांचे झाल्यानंतर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. यावर्षी बोंडअळीसाठी प्रायोगिक तत्त्वार रासायनिक फवारणी घेण्याचे टाळले. पाते, फुले कमी असल्यामुळे पूर्ण बोंडअळी वेचून काढण्याचा प्रयोग केला. या माध्यमातून बोंड अळीचा प्रादुर्भाव १०० टक्के रोखण्यात यश मिळाले. त्यानंतर मावा, तुडतुड्यांसाठी पहिली रासायनिक फवारणी पीक ४० दिवसांचे झाल्यानंतर घेतली. ३० सप्टेंबरपर्यंत पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे, मावा आदी किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाच फवारण्या घेतल्या आहेत.
वेचणी सुरू
सध्या कपाशीच्या झाडावर ७० ते ८० पर्यंत बोंडे लागलेली आहेत. आतापर्यंत दोन वेचण्या झाल्या असून, सहा क्विंटलपर्यंत कापूस निघाला. सध्या पाऊस थांबला असून सूर्यप्रकाश पडू लागल्याने बोंड फुटणे सुरू आहे. येत्या आठवड्यात तिसरी वेचणी केली जाईल. वातावरणातील आर्द्रतेमुळे कापसात ओलसरपणा आहे. त्यामुळे या कापसाची काळजी घ्यावी लागते आहे. कापसाला ऊन देणे, त्यातील कचरा बाजूला केला आहे. आता तिसरी व पुढील काळात चौथी वेचणी केली जाईल. अशा एकूण ५ वेचण्या केल्या जातील. शेवटची वेचणी साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पू्र्ण होईल.
कपाशीच्या क्षेत्रात मक्याची लागवड
आगामी काळात कपाशी लागवडीमध्ये आणखी तीन वेचण्या होतील. यापुढील काळात पावसाचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन केले जाईल. तसेच आवश्यकतेनुसार एक रासायनिक फवारणी घेतली जाईल. शेवटची वेचणी झाल्यानंतर कपाशी पीक उपटून त्या ठिकाणी मका लागवडीचे नियोजन आहे. त्यानुसार शेतजमीन तयार केले जाईल.
रवींद्र मापारी, ९४२२३५१०५६