जिगाव, नदीजोडमुळे गावे पाणीदार होनार…
बुलढाणा:शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला जिगाव सिंचन प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. हा प्रकल्प आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांमुळे खामगांव मधील गावे पाणीदार होणार आहेत.
लवकरच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.येथे कोट्यवधींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण रविवारी (ता. ६) फडणवीस यांच्या यांच्याहस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर व इतर व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, २०१४ साली जिगाव प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात चालना दिली. धरण बांधण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाइपलाइनने पाणी नेवून शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. आज ७ हजार कोटी रुपये जिगाव प्रकल्पासाठी दिले. त्याचे काम अतिशय वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे.खामगांव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाइपलाइनने पाणी येणार आहे. यासोबतच नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण अनुदानावर ठिबकद्वारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल आणि बागायती भाग म्हणून ओळखता येईल, असेही ते म्हणाले.
नदीजोड प्रकल्पाची किंमत अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता
दरम्यान जिगाव प्रकल्पाचे पाणी आरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी केली होती. त्याअनुषंगाने पुढील ५० वर्षे खामगांवला पाणी पुरेल इतके पाणी आरक्षण मंजूर केल्याचे जाहीर केले. यापुढे पाणीटंचाई भासणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.१० लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल’
वैनगंगा-नळगंगा नदीजोड हा ९० हजार कोटींचा प्रकल्प आहे. नद्यांचे पाणी भंडाऱ्यापासून बुलडाणा जिल्ह्यापर्यंत आणणार आहोत. १० लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. या प्रकल्पाच्या कामांची सुरुवात केली असून त्याचा फायदा खामगाव तालुक्याला होणार आहे. १०० टक्के सिंचनाखाली असलेला खामगांव तालुका अशी ओळख होईल. तालुक्यातील पांदण रस्त्यांसाठी मार्चच्या बजेटमध्ये २५ कोटी देणार असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.