खामगाव:येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलाचे अनावरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व उपमुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
नांदुरा रोडवरील प्रस्तावित नूतन न्यायालयाच्या ठिकाणी आयोजित समारंभप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती रविंद्र घुगे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमुर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश श्रीधर भोसले, जिल्हा न्यायाधीस तथा सत्र न्यायाधीश खामगांव गणेश जाधव, आमदार आकाश फुंडकर, डॉ. संजय कुटे, माजी आमदार चैनसुख संचेती व वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संजय बडगुजर यांच्यासह संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नूतन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालय ही सर्व सोयीसुविधाने सुसज्ज पाच मजली इमारतीचे निर्माण होणार आहे. ही प्रशस्त इमारत राज्यात तालुकास्तरावरील न्यायालयाची पहिली मोठी इमारत ठरणार आहे. 100 हून अधिक वर्षापूर्वीच्या इंग्रजकालीन इमारतीच्या जागी नूतन इमारतीचे बांधकाम होणार असून 12 हजार 500 चौ.फुट जागेवर जी प्लस फोर असे पाच मजल्याची इमारत उभी राहणार आहे.
या नूतन इमारतीमध्ये 12 कोर्ट सभागृह, पक्षकारांसाठी प्रतिक्षा कक्ष, महिला व पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र बार कक्ष, स्वतंत्र ग्रंथालय, परिषद सभागृह, उद्वाहक व्यवस्था, वायफाय प्रणालीसह संपूर्ण इमारत वातानुकूलित असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.