मलकापूर (बुलढाणा) : तिघांचा रेल्वे स्थानकात मोबाइल चोरीचा प्रयत्न करणे, रेल्वे पोलिसांना गुंगारा देत प्लॅटफाॅर्मवरून उड्या मारतानाच फायरिंग करण्याचा प्रकार घडला.
एखाद्या चित्रपटातील कथानकात दिसणारी ही घटना मलकापुरात दिवसाढवळ्या घडली आहे.रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत काहींनी हवेत गोळी झाडून पोबारा केला. त्यावेळी लगतचा रामवाडी परिसर चांगलाच हादरला आहे.रेल्वे स्थानकात रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नांदेड-श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दाखल झाली. त्यावेळी तिथे बसलेल्या तिघांपैकी एकाने रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरीचा प्रयत्न केला. परंतु, नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न हाणून पडला; पण गर्दी झाल्याने रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेत परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्या तिघांनी सराईतपणे रेल्वेच्या प्लॅटफॉर्म १ वरून नजीकच्या रामवाडी परिसरात उड्या घेत पळ काढला. मात्र, हा प्रकार रामवाडीतील ॲड. नीलेश तायडे व इतरांच्या लक्षात येताच लोकांनी गर्दी केली. त्यामुळे तिघांपैकी एकाने हवेत गोळी झाडली. त्यामुळे आपसूकच नागरिक बॅकफूटवर आले अन् तीच संधी साधून तिघे नांदुरा रस्त्याकडे पळाले.रस्त्यावर चालत्या ॲटोरिक्षात एक जण बसला. त्यापाठी दोघे जण बसले अन् पाहता पाहता तिघांनी पोबारा केला. लोकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल गोपाल व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तोवर त्या तिघांनी पोबारा केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अनिल गोपाल यांनी तत्काळ पोलिस उपनिरीक्षक ईश्वर वरगे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाला नांदुरा रस्त्यावर चौकशीसाठी रवाना केले आहे. पोलीस त्या तिघांचा शोध घेत आहेत. हवेत झाडलेल्या गोळीचे कव्हर पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, अचानक घडलेल्या या सिनेस्टाईल घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.