पोलीस कर्मचाऱ्याचा भांडुप ते नाहूर दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू..
मुंबई:लोकलने प्रवास करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.
अमित ज्ञानेश्वर गोंदके, असे या मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाणे येथून आपली ड्युटी संपवून डोंबिवली येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असताना लोकल मधून पडून गोंदके हे गंभीर जखमी झाले. गोंदके हे रात्रभर रेल्वे रुळावरच जखमी अवस्थेत पडून राहिल्यामुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित ज्ञानेश्वर कोंदके हे अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात सेवेला होते. काल रात्री नऊ वाजता ड्युटी संपल्यानंतर ते आपल्या डोंबिवली येथील घराकडे जाण्यासाठी निघाले. घाटकोपर पर्यंत मेट्रोने प्रवास करून पुढे घाटकोपरवरून डोंबिवलीकडे जाणारी लोकल पकडली.
मात्र भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे दरवाजातून पडून ते गंभीर जखमी झाले. रेल्वेतून पडल्यामुळे त्यांचा एक हात खांद्यापासूनच तुटून वेगळा झाला. शिवाय त्यांची डोक्याची कवटी फुटून डोक्याला देखील गंभीर इजा झाली होती. काल मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा देखील उशिराने सुरू असल्यामुळे प्रचंड गर्दीतून घराकडे जात असताना दरवाजात लटकल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र अमित कोंडके हे रात्रभर रेल्वे रुळाजवळच गंभीर जखमी अवस्थेत पडून राहिले.या अपघाताबाबतची माहिती 25 सप्टेंबर रोजी रात्रपाळीवर असणारे एएसआय चव्हाण यांना 26 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता एका प्रवाशाने दिली. एएसआय चव्हाण आणि सोबत एक हमाल यांनी घटनास्थळी रेल्वे किलोमीटर नंबर अप ट्रॅक 27/415 ते 27/506 जवळ अप रेल्वे लाईन जवळ भेट दिली.
यावेळी त्यांना रेल्वे रुळाजवळ निळी जीन्स पॅन्ट आणि निळसर काळा टी-शर्ट घातलेला आणि जखमी अवस्थेतील व्यक्ती आढळून आला.
रेल्वे रुळालगत पाहणी केली असता पोलीस गणवेश देखील आढळून आला. तो पोलीस कॉन्स्टेबल 1462 अमित ज्ञानेश्वर गोंदके मुंबई लोहमार्ग पोलीस असल्याचे आढळलेल्या ओळखपत्रावरून स्पष्ट झाले. चौकशीत गोंदके 2018 मध्ये पोलीस दलात भरती झाला असून अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे येथे नियुक्तीस असल्याचे समजते.
स्टेशन मास्तर यांनी पंचनामा करून जखमी व्यक्तीच्या हात खांद्यापासून कट झाला व डोक्याला मार लागून आतील कवटी फुटून, अंगावर खरचटले मुसळधार पावसामुळे रेल्वे उशिरा असल्यामुळे प्रचंड गर्दीतील जलद लोकल मधून पडून हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करून मेमो देऊन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सोय केली. एएसआय चव्हाण आणि सोबतच्या हमालांनी गोंदके यांचा मृतदेह मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात पाठवला आहे.