बुलढाणा : मागील १८ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदोलन आज, शुक्रवारी १८ व्या दिवशी चिघळले. चर्चेची बैठक पुढे ढकलल्याने बुलढाण्यात जिल्हाधिकारी समोरील रस्त्यावर ठिय्या देण्यात आला.मोताळा तालुक्यात एका कार्यकर्त्याने स्वतःला गाडून घेतले.आदिवासी कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र द्यावे व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर मागील २ जानेवारी २०२४ पासून आंदोलन सुरू केले.अन्नत्याग, टॉवर आंदोलन, रास्ता रोको अशी आंदोलने करूनही शासन व प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे १८ दिवसा नंतरही आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. दरम्यान, उशिरा का होईना ‘आरडीसी’ सदाशिव शेलार यांनी आंदोलकांशी चर्चेसाठी १९ जानेवारी ही तारीख निश्चित केली. यामुळे आंदोलकाशिवाय जिल्ह्यातील समाज बांधवांना बुलढाण्यात दाखल झाले.मात्र ऐनवेळी ही तारीख रद्द करून २२ तारखेला बैठक लावण्यात आल्याचे पत्र शेलार यांनी दिले. यामुळे संतप्त समाज बांधवांनी मंडपासमोरील रस्त्यावरच धरणे दिल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यामध्ये महिला व लहान मुलाची संख्या लक्षणीय होती. जोपर्यंत जिल्हाधिकारी मंडपात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा समाज नेते गणेश इंगळे यांनी दिला आहे.
दुसरीकडे मोताळा तालुक्यातील पलढग येथील गंगाधर तायडे यांनी मागण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेतले. यामुळे मोताळा तालुक्यासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली.